20 Oct 2026
बौद्ध जीवनाला नैतिकतेची जोड
विवाह हा अत्यंत प्राचीन संस्कार आहे. हिंदू धर्मात संस्कार तर बौद्ध धर्मानुसार तो करार आहे. संस्कारात तडजोड करीत विवाह टिकवणे महत्त्वाचे ठरते, ते कसे टिकावे हा महत्त्वाचा भाग नसतो, पण करारात मात्र विवाह टिकवायचा असेल तर समंजसपणा ,नैतिकता, एकमेकांविषयी समानतेची भावना, आदर व प्रेम फार महत्त्वाचे असते. हे जर नसेल तर करार मोडला जाऊ शकतो.
जातक कथेत लिहिल्या प्रमाणे: "स्नेहाशिवाय असलेली जोडी दुःखद आहे." बुद्धाने विवाहावरील दैवी गोंधळ उध्वस्त करून त्याला मानवी अनुभवाच्या क्षेत्रात आणले. त्यांनी विवाहाला स्वर्गाच्या आज्ञेवर आधारित नाही तर नैतिक भागीदारी सामाजिक व भावनिक करार म्हणून पाहिले .या सर्व पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबा फुलेंच्या शब्दा सांगायचे झाल्यास "विवाह हा पवित्र संस्कार नव्हे तर पवित्र करार आहे." तो टिकतो तो एकमेकांच्या सामंजस्यावर.
आता बौद्ध विवाह पद्धतीचा विचार केल्यास त्यात परंपरागत परंपरेच्या अनेक गोष्टींना बाजूला सारणे महत्त्वाचे ठरते. अनेक ठिकाणी विवाह हा एकदाच होणारा आनंदाचा क्षण म्हणून मोठ्या दिखाऊपणाने तो पार पाडला जातो. अर्थात तो प्रत्येकाच्या ऐपतीचा व त्यांच्या विचारांचा भाग आहे; परंतु बौद्ध विवाहाचे काही नियम असायला पाहिजेत. आपल्या आनंदावर विरजण न घालता काही जुन्या प्रथांना कलाटणी देवून बौद्ध विवाह पार पाडणे आवश्यक आहे. ज्या धर्मात पिढ्यानपिढ्या राहून आपल्या समाजाला कोणतेच माणुसकीचे अधिकार मिळत नाही अशा परंपरागत धर्माचा त्याग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व आपल्या लाखो अनुयायांना दिली. त्यानंतर त्या अनुयायांनी त्या बुरसटलेल्या हिंदू धर्माचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टी देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या बौद्ध अनुयायांचीच आपण पुढची पिढी म्हटले तरी चालेल. दीक्षा देतांना बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या व त्या प्रतिज्ञा स्वेच्छेने स्वीकारण्यास सांगितल्या. त्यातील 21 साव्या प्रतिज्ञेत बाबासाहेब सांगतात ,मी हिंदू धर्माचा त्याग केला ;माझा नवा जन्म झाला .या प्रतिज्ञा आजही आम्ही अनेकदा म्हणत असताना आताही जुन्या प्रथा परंपरांना का जपतो ? उदा. विवाह प्रसंगी हळद लावणे ,हिरव्या बांगड्या घालणे ,डोक्यात कुंकू भरणे, मंगळसूत्र घालणे,पायात जोडवी टाकणे, विवाहाचे वेळी नवऱ्या मुलाच्या मुलीने पाया पडणे, ओटी भरून पाठवणी करणे इत्यादी अनेक अशा हिंदू धर्मातून आलेल्या प्रथांना कलाटणी देणे आता महत्त्वाचे आहे .
याशिवाय विवाह प्रसंगी मोठे मोठ्या आवाजात डिजे लावणे; आनंदाचा प्रसंग नक्कीच साजरा करावा पण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यावी .त्यामुळे ही नाचगाणी जरा छोटे आवाजात करीत इतरांना त्रास होणार नाही यासाठी बौद्ध बांधवांनी कटिबद्ध असायला पाहिजे.
याशिवाय विवाहानंतर पहिली पौर्णिमा मुलीने आपल्या सासरी राहू नये. या हिंदू प्रथांना बौद्ध धम्म संस्कारात स्थान देऊ नये. विवाह प्रसंगावेळीच जर आपण बौद्ध आहोत हे लक्षात घेऊनच कार्यक्रम पार पाडले तर नवविवाहित जीवनात बौद्ध धर्माची एक संस्कारी झालर नक्कीच निर्माण होईल.
त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दोघांचेही एकमेकांशी असलेले संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण, विश्वासपूर्ण व नैतिकतेवर आधारित असणे महत्त्वाचे आहे .कारण याचाच परिणाम येणाऱ्या भावी पिढीवर होत असतो. सध्या 21 साव्या शतकात जगत असताना मुले-मुली कुटुंबाशिवाय नवीन जगाच्या संपर्कात मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांचे जगण्याचे व कामाचे क्षेत्रही विस्तारले आहे. अशावेळी अनेक नवे मित्र- मैत्रिणी जीवनात येतात. प्रसंगी एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात. ते व्हायलाच पाहिजे; पण या मित्रमैत्रिणींमुळे आपल्या वैवाहिक जीवनाला धोका निर्माण होणार नाही, आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होणार नाही याकडे बौद्ध मुलामुलींनी विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे .याशिवाय कोणत्याही वस्तूंची अवास्तव मागणी करून आई वडिलांना त्रास होणार नाही; याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. उदा. घर घ्यायचे ,गाडी घ्यायची तर मग माग तुझ्या बापाला पैसा; माग तुझ्या भावाला पैसा; असा सूर अनेकदा नवऱ्या मुलांकडून आळवला जातो; हे बौद्ध धम्माचे विसंगत वर्तन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1942 च्या नागपूर येथील दलित महिलांच्या परिषदेत म्हणतात; पती पत्नीचे संबंध मित्र मैत्रिणीप्रमाणे असावेत. पत्नीने पतीच्या प्रत्येक कार्यात त्याची सहचारिणी बनूनच नव्हे तर मैत्रिण म्हणून सहकार्य करावे; परंतु तो पती जर तिला त्रास देणारा असेल तर त्या पतीविरुद्ध तिने उभे राहावे. 1942 च्या परिषदेतील बाबासाहेबांचे हे वक्तव्य आजच्या तरुण विवाहितांना दिशादर्शक आहेत. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना एकमेकांविषयी प्रेम, एकमेकांच्या भावनेचा आदर, करणे महत्त्वाचे आहे. हे दोघांकडून सारख्याच प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. कारण बाबासाहेब हे स्त्री -पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. बौद्ध बांधवांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. या सर्व गोष्टींच्या कसोट्यांवर राहूनच बौद्ध वैवाहिक जीवनातून एक चांगले नीतिमान आदर्श कुटुंब निर्माण होऊ शकते.

प्रा. माधुरी मिलिंद दुपटे (गायधनी)
बहुजन स्त्रीवादी लेखिका व ओबीसी समाजचिंतक
📍 नागपूर, महाराष्ट्र
📞 9561036050
More from the Blog
29 Oct 2026
बौद्धधम्म व मंगल परिणय : समता, मैत्री, करुणा आणि सहजीवनाचा मंगलमय संस्कार
लेखक: भदन्त डॉ. आयुपाल महाथेरो\ एम.ए. | एम.फिल. | पीएच.डी. (मानसशास्त्र एवं इतिहास)| मुंबई विद्यापीठ संपर्क: +91 98190 19289 ई-मेल: drayupal\@gmail.com
Read more
28 Oct 2026
The 10 Precious Jewels of Dhamma Given by Tathagata Gautama Buddha
Miss. Simran Thool, M.A. in Political Science | Law Student, Government Law College (GLC), Mumbai Contact: +91 92264 12793
Read more
25 Oct 2026
धम्मविवाह - दोन कुटुंबाचा उत्कर्ष
श्री. राज गायकवाड जीएसटी अधिकारी | महाराष्ट्र शासन 📞 +91 80552 03036
Read more